Mumbai :महानायक अमिताभ बच्चन होस्ट म्हणून लाभलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती या गेमशोच्या 16 व्या सीझनमध्ये स्पर्धकांच्या प्रेरणादायक प्रवासाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जात आहे. या प्रवासांमध्ये लक्षावधी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. स्पर्धकांशी जुळणारे हे नाते आणि खेळातील बौद्धिक आव्हान यामुळे एकामागून एक आठवडे प्रेक्षक त्या शोमध्ये गुंतून राहिलेले दिसत आहेत. एका आगामी भागात सांगलीहून आलेला प्रशांत प्रमोद जमदाडे हॉटसीटवर विराजमान झालेला दिसेल. लहानपणापासून प्रशांतला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. त्याच्या पाठीवर एक गाठ आहे, ज्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने शस्त्रक्रिया करताना त्याच्या नसा प्रभावित झाल्या त्यामुळे त्याच्या पायांची हालचाल बंद झाली. आपल्या या स्थितीचा इलाज करण्यासाठी चांगले उपचार घेण्याची त्याची इच्छा आहे, पण कुटुंबाच्या मर्यादित उत्पन्नामुळे ते कठीण आहे.
त्याची अडचण जाणून व्यथित झालेल्या अमिताभ बच्चन यांनी प्रशांतला आधार देऊन हॉटसीटवर बसायला मदत केली. जिंकलेल्या बक्षिसाच्या रकमेतून काय करण्याची इच्छा आहे, असे विचारल्यावर प्रशांतने सांगितले की आपल्या अपंगत्वावर योग्य उपचार घेण्याची त्याची इच्छा आहे. अमिताभ बच्चन यांनी त्याला विचारले की एखाद्या डॉक्टरचा सल्ला त्याने घेतला आहे का. त्यावर प्रशांत म्हणाला, “सांगलीमध्ये चांगली हॉस्पिटल्स नाहीत.” त्यावर त्याला आश्वासन देत अमिताभ बच्चन म्हणाले, “नसांच्या उपचारांसाठी मुंबईत अनेक उत्तम हॉस्पिटल्स आहेत. तुला मदत करण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. कृपया तुझे सगळे आवश्यक तपशील मला दे. तुझ्या वतीने मी हॉस्पिटलकडे शब्द टाकीन.”
या शोमध्ये पुढे प्रशांतने सांगितले की, त्याला आपल्या वाडिलांसाठी कानाचे मशीन घ्यायचे आहे, कारण त्यांना वयोमानापरत्वे कमी ऐकू येते. प्रशांतचा समजूतदारपणा पाहून अमिताभ स्मित हास्य करत म्हणाले, “हो, मी समजू शकतो. मी स्वतःच एक मशीन घेण्याचा विचार करत आहे.”
बिग बींचा मोठा चाहता असलेला प्रशांत म्हणाला, “तुमची ऊर्जा इतकी अफाट आहे की, एखाद्या तरुणालाही लाजवेल. देव तुम्हाला दीर्घायु देवो आणि कौन बनेगा करोडपती असेच चालत राहो.”