जुन्नर तालुक्यातील बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरी “राजा”ला निरोप

पुणे : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे बैलगाडा शर्यत. याच क्षेत्रातले नावाजलेले नाव गारुडीबाबा बैलगाडा संघटनेतील बैलगाडा शर्यतीतील हिंदकेसरी म्हणून ओळख असलेल्या स्व. बबन शिवराम वंडेकर यांच्या फायनल सम्राट असलेल्या “राजा” नावाच्या बैलाने वयाच्या २२ व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला. आज त्याचा दशक्रिया विधी पार पडला.

हिंदकेसरी राजा पिंपरी पेंढार गावातील गायमुखवाडी परिसरातील वंडेकर कुटुंबाचा जीव की प्राण होता. बैलगाडा शर्यतीत राजाने १७ ते १८ वर्षे घाट गाजविला. अनेक शेतकऱ्यांची मने जिंकून घेतली होती. नगर व पुणे जिल्ह्यात मोठ मोठ्या घाटांमध्ये हिंदकेसरी राजाने शर्यती गाजवल्या. फायनल जिंकून वंडेकर कुटुंबाचा व पिंपरी पेंढार परिसराचा नावलौकिक वाढवला आहे. मात्र तो आज आपल्यात नसल्याने सर्वांना दुःख होत आहे.

घाटातील शर्यतीत खेळताना राजाने अनेक तरुण खोंडांना शिस्तीने पळणे शिकवले. नवीन खोंडांना शिकवताना त्याने स्वतः चे काही नियम घालून घेतले होते. बैलगाडा शर्यतीत गाड्याला पळताना त्याला कोणीही पकडले तरी चालायचे.

गारुडीबाबा बैलगाडा संघटनेतील हिंदकेसरी सम्राट गोठ्यावर आल्यानंतर कुटुंबातील ठराविकच लोक राजाला पकडू शकत होते. तो दुसऱ्याला तो हात लावू देत नसे. हिंदकेसरी राजाचा रुबाबदार देह पाहूनच त्याच्यातील वेगळेपण जाणवत होते. पिंपरी पेंढार येथील अमोल आणि आनंद वंडेकर व पशुवैद्यकीयचिकित्सक अरविंद वंडेकर कुटुंबाने राजावर जीवापाड प्रेम केले. त्याच्या कामगिरीने अनेक गाडा मालकांनी राजाला विकत घेण्यासाठी दहा ते अकरा लाखांपर्यंत बोली लावली होती. पण घरचा सगळ्यांचा लाडका राजा त्यांनी विकला नाही. राजाने अनेक घाटांमध्ये कुटुंबाचे, गावचे व तालुक्याचे नाव मोठे केले. अशा हिंदकेसरी राजाने शनिवारी (दि. १९) जगाचा निरोप घेतला. राजाला कुटुंबासह गावातील अनेकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

त्याच्या जाण्याने बैलगाडा शौकीनामध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.