शिरूरसाठी अजितदादादांनी उमेदवार शोधला, माऊली कटके यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

पुणे : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यातुन एकमेव आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्यासोबत राहिले होते. लोकसभेत त्याचा मोठा फायदा शरद पवार गटाला आणि अमोल कोल्हे यांना झाला. मात्र आता विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवारांना उमेदवार मिळत नव्हता. मात्र आता माजी जिल्हा परिषद माऊली कटके यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिरूर – हवेली विधानसभेसाठी अशोक पवार यांच्याविरोधात शिलेदार शोधला असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत माऊली कटके यांनी हाती घड्याळ घेतले आहे. त्यामुळे महायुतिकडून माऊली कटके हे शिरूरचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरु झाली आहे.

या विधानसभेसाठी अगोदर प्रदीप कंद यांचे नाव चर्चेत होते. मात्र, माऊली कटके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपच्या उमेद्वाराच्या आशा मावळल्या आहेत.

अशोक पवार यांना स्पर्धक म्हणून स्वर्गीय आमदार बाबुराव पाचरणे यांचे नाव घेतले जायचे. मात्र त्यांच्या निधनानंतर अशोक पवार यांना कुठलाही प्रतिस्पर्धी उरला नसल्याचे एकंदरीत तालुक्यात वातावरण आहे. त्यामुळे महायुती शिरूर हवेली विधानसभेमध्ये बॅकफूटवर गेलेली पाहायला मिळते. माऊली कटके यांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला असला तरी त्यांच्या उमेदवारी अद्याप ठरलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अशोक पवारांविरोधात महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते. हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. महायुतीकडून ही जागा अजित पवारांकडे गेली तर माऊली आबा कटके हे महायुतीचे उमेदवार मानले जातात. त्यामुळे येणाऱ्या काळात अशोक पवार यांच्याविरुद्ध माऊली कटके असा सामना रंगू शकतो.

कोण आहेत माऊली आबा कटके?माऊली कटके हे उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष होते. तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पहिले आहे. तसेच ते कट्टर शिवसैनिक म्हणून देखील त्यांची ओळख आहे.