शिरूर (पुणे ):शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार यांनी तगडाकडे मैदानात उतरवला आहे. त्यामुळे शिरूर विधानसभेचा अजित पवार गटाचा जागेचा तिढा सुटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या जागेवर सस्पेन्स कायम होता. यामुळे भाजपचे नेते प्रदीप कंद यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढत शिरूर विधानसभेमध्ये होणार आहे.
निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक मतदारसंघांबाबत चर्चा सुरू होत्या. अद्यापही काही जागांचा तिढा सुटलेला नाही. मात्र शिरूर विधानसभेचा तिढा सुटला आहे. त्यामुळे अशोक पवार यांच्याविरोधात माऊली कटके यांची लढत होणार आहे.जिल्ह्यातील अनेक जागाबाबत तिढा होता. मात्र अजित पवार गटाच्या पुणे जिल्ह्यातील सर्वच जागाचा तिढा सुटला आहे. दुसऱ्या यादीत माऊली कटके यांचे नाव आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे.
त्यामुळे आता शिरूर विधानसभेसाठी अगोदर शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले माऊली कटके यांनी आता घड्याळ हाती घेतले असून ते अशोक पवार यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.
शिरूर तालुक्याच्या विकासासाठी मी या निवडणुकीत उतरलो आहे. मला संधी दिल्याबद्दल माझ्या वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानतो. या निवडणुकीत मी बाजी मारणारच अशा भावना माऊली कटके यांनी व्यक्त केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून माऊली कटके हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी नागरिकांना उज्जैन महाकाल दर्शन घडवले आहे. आपल्या मतदारसंघातील अबालवृद्धांना त्यांनी महाकालचे दर्शन घडवुन आणल्याने त्यांची शिरुर शहर, पुर्व भाग व हवेलीत सर्वत्र चर्चा सुरु आहे. तसेच त्यांचा अनेकांशी थेट संपर्क असल्याने शिरुरची लढत तुल्यबळ होणार आहे.