पुणे : वाघोली (ता.हवेली) शिरूर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्यातील लढत अधिकच रंगतदार होत आहे. वाघोली या निर्णायक गावात महायुतीची स्थिती भक्कम असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि समर्थकांनी मोठ्या जोशात प्रचारास सुरुवात केली असून, वाघोलीतील परिवर्तनाची हाक मतदारांना आवाहन देत आहे.
महायुतीची एकजूट व बळकट स्थिती
वाघोलीमध्ये ज्ञानेश्वर कटके यांचा स्थानिक उमेदवार म्हणून मोठा जनाधार असून, मतदारसंघात त्यांचे भव्य स्वागत व प्रचार होत आहे. महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय प्रचार करत आहेत. भाजप, अजित पवार गट, आणि शिवसेना शिंदे गटाने मिळून वाघोलीच्या पातळीवरून परिवर्तनाची लाट निर्माण केली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही प्रचार सुरू केला असला तरी त्यांना तगडी भूमिका घेण्यासाठी बूस्टरची गरज असल्याचे स्पष्ट होते.
शिरूर-हवेलीची प्रतिष्ठेची निवडणूक
शिरूर-हवेली मतदारसंघातील या निवडणुकीत निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. एकीकडे महायुतीचे घटक शांताराम कटके आणि प्रदीप कंद यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीसाठी पेचप्रसंग निर्माण केला होता. मात्र, महायुतीच्या मध्यस्थीनंतर कंद यांनी अर्ज माघारी घेत प्रचारात सक्रिय सहभाग दिला आहे, ज्यामुळे महायुतीला वाघोलीत अधिक बळ मिळाले आहे.
वाघोलीतील निवडणुकीचे महत्त्व
वाघोलीसारख्या महत्त्वाच्या गावात जवळपास ६६ हजार मतदार असून, या मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र गेम चेंजर ठरणार आहे. वाहतूक कोंडी, मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव, आणि वाढत्या नागरी समस्यांवर नाराज असलेले मतदार त्यांच्या भूमिकेचा स्पष्ट संदेश देण्यास सज्ज आहेत.
महाविकास आघाडीला बूस्टरची गरज
महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी निवडणुकीपूर्वी वाघोलीत मोठ्या प्रमाणावर दौरे करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रचाराच्या आघाडीवर अद्याप महायुतीसारखे बळ मिळालेले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले असले तरी त्यांच्या प्रयत्नांना अधिक गती देण्यासाठी महाविकास आघाडीला बूस्टरची आवश्यकता आहे.
निवडणूक अटीतटीची…
वाघोलीतील तगडी स्पर्धा आणि प्रचारातील आरोप – प्रत्यारोपांच्या फेऱ्यांमुळे यंदाची निवडणूक अधिक अटीतटीची होणार आहे. निवडणुकीतील हे रंगतदार चित्र संपूर्ण मतदारसंघातील मतदारांचे लक्ष वेधून घेत असून, वाघोलीतील स्थिती अखेर कोणाच्या बाजूने झुकते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.