महिला पत्रकाराला उमेदवाराच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याची धमकी

तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : विरोधात वार्तांकन का करतेस, असा जाब विचारत एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मावळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराच्या दोन नातेवाईकांसह चौघांविरुद्ध लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे देखील दाद मागण्यात आली आहे.

लोणावळा येथे ११ नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन आहेर यांची पत्रकार परिषद होती. त्यानंतर आरोपींनी संबंधित महिला पत्रकाराला आडवून धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार किशोर भेगडे, संदीप भेगडे व अन्य दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर भेगडे हे तळेगाव चे माजी उपनगराध्यक्ष आहेत.

लोणावळ्यात नऊ नोव्हेंबरला संध्याकाळी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे व महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांचे समर्थक आमने-सामने आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याप्रकरणाची चुकीची बातमी दिल्याचा आरोप करीत भेगडे यांच्या समर्थकांनी संबंधित महिला पत्रकाराला जाब विचारला व निवडणुकीनंतर बघून घेण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी संबंधित पत्रकार महिलेने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन लेखी तक्रार अर्ज दिला. त्याची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश लोणावळा शहर पोलिसांना दिले. त्यानुसार 12 नोव्हेंबरला पत्रकार महिलेची तक्रार नोंदवून घेण्यात आली.