पुणे : छत्रपती शिवरायांच्या विचारांचा हा महाराष्ट्र असल्यामुळे महिलांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. खबरदार, महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य कराल तर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज (शुक्रवारी) दिला.
मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या जांभूळ येथील जनसंवाद सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुनील शेळके तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारात वारंवार महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये होत असल्याबद्दल उपस्थित महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी विरोधी उमेदवाराचा जाहीर निषेधही करण्यात आला.
रूपाली चाकणकर म्हणाल्या की, लोणावळा येथे महिला पत्रकाराला दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची सूचना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केली आहे. निवडणूक प्रचारात महिलांविषयी बोलताना सर्वच नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मर्यादांचे पालन करावे. महिलांविषयी आक्षेपार्ह, अश्लील, अश्लाघ्य वक्तव्य कराल तर खबरदार! महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत कठोरात कठोर शासन केले जाईल.
यासंदर्भात प्रचाराच्या चित्रफितीची शहानिशा करून दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आले आहेत. महिलांनी देखील न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी. पोलिसांकडे जाणे शक्य नसेल तर ऑनलाईन तक्रार करण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे, असे चाकणकर यांनी सांगितले.
माता-भगिनींचा अपमान खपवून घेणार नाही – सुनील शेळके
विरोधकांनी माझ्यावर वैयक्तिक कितीही टीका केली तरी ती सहन करण्याची ताकद माझ्यात आहे, मात्र तालुक्यातील माझ्या माता-भगिनींविषयी अवाक्षर काढलेले देखील मी खपवून घेणार नाही. विरोधकांनी माता-भगिनींविषयी बोलताना जीभ सांभाळून बोलावे, असे आमदार सुनील शेळके यांनी ठणकावले.