पुण्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा राज्याला दिशादर्शक ठरेल असा करा : प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील 

पुणे : पुणे जिल्ह्याचे भौगोलिक व औद्योगिक क्षेत्र, वाढते नागरीकीकरण तसेच आपत्तीच्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी त्यानुसार असणारा जलद प्रतिसाद याकरीता लागणारी साधने याबाबींचा सर्वांगिण विचार करता सर्व विभागाचा सहभाग घेत राज्याकरीता दिशादर्शक ठरेल, यास्वरुपाचा आदर्श आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मितीबाबत कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक संजय गिरी, सिड्स टेक्निकल सर्व्हिसेसचे अभिजित घोरपडे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतूदीनुसार जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करणे आवश्यक आहे, याकरीता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्ह्यातील सर्वसंबंधित विभाग, विविध सामाजिक संस्था यांना सहभागी करुन घ्यावे. जिल्ह्यात औद्योगिक सुरक्षा, आरोग्य विभागाचे आराखडेही यामध्ये समावेश करण्यात यावे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यामदतीने सर्व संबंधित विभागानी आपल्या विभागाचे आराखडे तात्काळ तयार करावे, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या.

घोरपडे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि युएनडीपी यांच्या संयुक्त विद्यमाने सिड्स टेक्निकल सर्व्हिसेस यासंस्थेच्या मदतीने जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मितीचे काम सुरु आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने विभागाने सूचना कराव्यात, असे आवाहन घोरपडे यांनी केले.

या कार्यशाळेत सर्व विभागातील अधिकारी व विभाग प्रमुखांनी सहभाग नोंदवला तसेच संभाव्य आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने गटकार्याच्या माध्यमातून आरखडे तयार करून सादरीकरण करण्यात आले.