नागपूर : राज्यात बीड जिल्ह्यातील मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने खळबळ उडवली होती. त्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली. त्यावरून बीड जिल्ह्यात अराजक माजले असल्याचे पाहायला मिळाले. याबाबत राज्यसरकारने कडक कारवाईचे आश्वासन देत विधानसभेत आज निवेदन सादर केले. यात बिडच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली आहे. तसेच एपिंची तात्काळ बदली करण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच या घटनेत ज्या वाल्मिक कराडचे नाव येत आहे. त्याच्यावर कारवाईचा शब्द सभागृहात फडणवीस यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा देखिल केली. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाना राज्य सरकारच्या वतीने दहा लाखाची मदत जाहीर केली.
मुख्यमंत्र्यानी निवेदनात काय म्हटले?
या प्रकरणात वारंवार वाल्मिक कराडचे नाव घेतलं जातंय त्यामुळे सांगतो की , या गुन्ह्यात कुणीही दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. त्याचे फोटो सर्वांसोबत आहेत. आमच्या सोबत, पवार साहेबांसोबतही फोटो आहेत. तो कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे, त्याचा विचार न करता कारवाई करण्यात येणार आहे. एका प्रकरणात तो आरोपी आहे, त्यात कारवाई होणाच, पण या प्रकरणात पुरावे मिळाल्यानंतर त्याला सोडणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
काय आहे बिडच संपूर्ण प्रकरण?
- मुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर करताना संतोष देशमुख हत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपुरतं प्रकरण नाही. याची पाळेमुळे खणावी लागतील. “एव्हाडा एनर्जी” यांनी बीडमध्ये पवनचक्की मध्ये गुंतवणूक केली आहे. यातून काही लोकांना रोजगार मिळत आहे. आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या असा प्रकार सुरू आहे.यात अशोक घुले, नारायण घुले, प्रतिक घुले असे आरोपी दुपारी तिकडे गेले. त्यांनी तेथील वॉचमनला मारहाण केली. त्यानंतर पीडितांनी सरपंचांना फोन केला. आरोपी शेजाराच्या गावचे होते. देशमुख आणि अन्य काहीजण तिथे पोहचले. त्यांना मारहाण केली. त्यानंतर याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले. त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले आणि स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली.सरपंचांचा भाऊ हा सातत्याने विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. 15मिनिटात सोडतो, 20 मिनिटांत सोडतो असे सांगत होता, पण सोडले नाही. त्यांना प्रचंड मारहाण केल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या संदर्भातील सुरेश धस यांनी मुद्दा मांडला, त्यांचे डोळे जाळले नाही, डोळ्यावर मारहाण केलेली आहे, पण ही निर्घृण हत्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले आहे.