मराठी भाषा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचे काम करावे : उदय सामंत यांच्या सूचना

पुणे: मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल अशा पद्धतीने काम करतानाच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावे, असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड येथे मराठी भाषा विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मराठी भाषा विभागाचे अवर सचिव नितीन डंगारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक तथा विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. शामकांत देवडे, भाषा संचालक विजया डोणीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, विभागाच्या कक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकर आदी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यभाषेला अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या तामिळनाडू किंवा अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही आपल्या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून अधिकाधिक निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवून गतीने पाठपुरावा करावा.

ते पुढे म्हणाले, दुसरे विश्व मराठी संमेलन27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे तीन दिवस पुणे येथे घेण्यात येईल. त्यासाठी विभागाने तयारी करावी. तसेच दिल्ली येथे होणाऱ्या विश्व साहित्य संमेल्लनात मराठी भाषेसाठी एक तास राखून त्या माध्यमातून जागतिक स्तरावर मराठी भाषा जाईल यासाठी प्रयत्न करावेत.

राज्यस्तरावर महिला साहित्य संमेलन तसेच विभागनिहाय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मराठी भाषा मंत्री  सामंत यांनी दिले. देशातील सर्व बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळांना आमंत्रित करुन मराठी भाषेसाठी काय योगदान देता येईल यासाठी त्यांच्या सूचना जाणून घ्याव्यात. सर्व महाविद्यालयात मराठी भाषा विभागाची प्रकाशने ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

सर्व विद्यापीठातील मराठी भाषा विभागात मराठी भाषा संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्ताव करावेत. पुस्तकांचे गाव या संकल्पनेच्या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्यातील नामांकित लेखकांची नावांची यादी करावी, त्याचप्रमाणे कवितांचे गाव या संकल्पनेवरही काम करावे. शासनाच्या सर्व विभागांच्या प्रदर्शनात मराठी भाषा विभागाचे दालन असले पाहिजे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मराठी भाषेला अभिजात मिळाल्याचे महत्त्व तसेच त्यामुळे होणारे लाभांची माहिती युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या सर्व संस्था, मंडळ, संचालनालयांना चांगली जागा मिळण्यासाठी प्रस्ताव करावेत, त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.