मुंबई : रस्त्यात खेळत असलेल्या एका सहा वर्षाच्या मुलाच्या अंगणावरून एका दुर्लक्षित वाहन चालकाने कार नेल्याची घटना समोर आली आहे. दैव बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचा जीव थोडक्ययात बचावला आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे.
राघव कुमार चव्हाण असे या चिमुकल्याचे नाव असून तो वसई भागातील वालीव परिसरात राहतो.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वालिव भागात एका व्यक्तीने ओला ॲपवरून बुक केलेली कार आली. कार बुक केलेल्या व्यक्ती या कारमध्ये बसला. त्यानंतर कारचालकाने कार समोरच खेळात रमलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्या राघवकडे दुर्लक्ष करत थेट त्याच्या अंगावरून कार नेली. चिमुकला कारच्या चाकाखाली आल्याचे लक्षात आल्यानंतर देखील कारचालकाने कार थांबवली नाही. थेट चिमुकल्याच्या अंगावरून कार नेऊन कोणतीही फिकीर न करता तेथून निघून गेला. परिसरातील स्थानिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कारचालक तेथून निघून गेला.
कारचालकाने चिमुकल्या राघवच्या अंगावरून कार नेल्यानंतर काही क्षणातच राघव उभा राहिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.
सुदैवाने या भीषण अपघातात चिमुकल्या राघवचे प्राण वाचले असून त्यात तो गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणी कारचालकाविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार कार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.