चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलीसावर कठोर कारवाई करा : डॉ. नीलम गोऱ्हे यांची पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा*

पुणे : विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. सचिन सस्ते असे या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. त्याच्यावर पॉक्सोसह ॲट्रॉसिटीनुसार (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या़ंनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने आणि पोलीस निरिक्षक धुमाळ यांच्यासोबत चर्चा केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपी पोलिसाला २५ डिसेंबर रोजी एका दिवसाकरिता बंदोबस्तासाठी पाठवलं होतं. त्याला विसापूरच्या पायथ्याखाली बंदोबस्त दिला होता. यावेळी जेवताना त्याने मद्य प्राशन केले. त्यानंतर लघुशंकेला जातो म्हणून तो तिथून खाली गेला. तिथे चिमुकली खेळत असताना तिला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि संधीचा फायदा घेत त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. घडलेला सर्व गैरप्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला. या घटनेची तक्रार आल्यानंतर आम्ही तिथे गेलो. त्या पोलिसाला ताब्यात घेतलं. त्याची मेडिकल तपासणी झाली. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली आहे.’

याबाबत बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांनी म्हटलं की, “लोणावळा खंडाळा परिसर सुप्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असल्यामुळे अनेक पर्यटकांची येथे रेलचेल असते. या पर्यटकांमध्ये अनेक महिला आणि मुलींचा समावेश असतो त्यामुळे महिला मुख्यत्वे करून लहान मुली यांच्या संरक्षणाकरिता व त्यांना मदतीकरिता महिला पोलिसांची आवश्यकता आहे. तसेच, यथाशक्य बालसमुपदेशक सुद्धा आवश्यक आहे. लोणावळा खंडाळा परिसरामध्ये स्थानिक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी इतर क्षेत्रातील पोलिसांची अतिरिक्त कुमक गस्तीसाठी मागवावी लागते त्यामुळे बाहेरील पोलिसांची मदत घेते वेळेस त्यांची सेवा पडताळणी करणे आवश्यक वाटते.”

त्याचबरोबर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्त्री आधार केंद्र, पुणे या संस्थेच्यावतीने २५ हजार रुपयांची मदत पीडित मुलीच्या पालकांना दिली. तसेच, मनोधैर्य योजनेतून अतिरिक्त मदत शासनातर्फे देण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा दिली.