दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या समारोपाला अजित पवार येणार

पुणे : सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभास उपस्थित राहण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केले असून संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे होत आहे. दि. 23 रोजी आयोजित समारोप सोहळ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती असणार असून उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रसंगी उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. संमेलनाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक डॉ. सतिश देसाई आणि व्यवस्थापन समिती सदस्य युवराज शहा यांनी आज (दि. 14) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन संमेलनास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले.

निमंत्रणाचा अजित पवार यांनी स्वीकार केला असून अनेक वर्षांनंतर दिल्लीत संमेलन होत असून मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आणि शासन म्हणून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही पवार यांनी दिली असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.

दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्यप्रेमी दिल्लीस येण्यास इच्छुक असल्याचे डॉ. देसाई आणि शहा यांनी अजित पवार यांना सांगितल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने संमेलन यशस्वी करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.