खाजगी सावकाराच्या त्रासाने मुलाची गळा दाबून हत्या, आई वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून 9 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करून आई वडिलांनी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेत आईचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

धनराज वैभव हांडे ( वय 9) असे गळा दाबून मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. तर शुभांगी वैभव हांडे असे महिलेचे नाव आहे. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सावकरासह अन्य जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत वैभव हांडे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वैभव हांडे यांनी एका खाजगी सावकाराकडून अंदाजे 4 ते 8 लाख रुपये 10 टक्के व्याजाने घेतले होते. त्याची परतफेड करण्यासाठी सावकार शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. हांडे यांच्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी आरोपी सावकार संतोष कदम, एक महिला आरोपी, संतोष पवार, जावेद खान यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

यात धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी 9 वर्षीय मुलाने सुद्धा आत्महत्या केली असे गृहीत धरण्यात येत असताना त्याचा शव विच्छेदन अहवालसमोर आल्यानंतर त्याची प्राथमिक दृष्ट्या गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं निदर्शनात आले आहे.त्यामुळं पोलीसांनी वडिलांवर ही गुन्हा दाखल केला आहे