शिवसनेचे मोर्चेबांधणी असफल, रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे, भरत गोगावले यांचा पत्ता कट

रायगड : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी चांगली रस्सीखेच सुरु होती. शिवसेनेचे भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात चांगलीच स्पर्धा लागली होती. यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झाल्या होत्या.

भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे यासाठी शिवसेनेकडून जोरदार मागणी देखील करण्यात येत होती. मात्र आज जाहीर झालेल्या यादीमध्ये रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या महिला वा बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळे यावरून पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनाने चांगलीच कंबर कसली होती. तशी मोर्चे्बांधणी देखील शिंदे शिवसेने केली होती. मात्र पालकमंत्री पदाची यादी जाहीर आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद पुन्हा अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. आता जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.