पुणे : पुण्यात बनावट नोटांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून १० लाख ३५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा दिल्लीतून आणल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केली असून नीलेश वीरकर, सैफान पटेल, अफजल शहा, शाहीद जक्की कुरेशी, शाहफहड अन्सारी अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सहकारनगर पोलिस ठाण्यातील तपास पथक पद्मावती भागात गस्त घालत होते. यावेळी पद्मावती बस स्थानकाजवळ एकजण पोलिसांना पाहून स्वारगेटच्या दिशेने पळू लागला. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्याला त्याला पाठलाग करून पकडले त्याची झाडाझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडलआढळले. रात्री अंधारात तो बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्न करीत होता. त्याला शाहीद कुरेशी, सैफान पटेल, अफजल शहा यांनी या नोटा दिल्याचे त्याने सांगितले. सहकारनगर पोलिसांनी एक-एक साखळी जोडत पाच जणांना अटक केली त्यांच्याकडून १० लाख ३५ हजार रुपयांच्या पाचशेच्या दोन हजार नोटा जप्त केल्या. या सर्व बनावट नोटा दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून आणल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.