शिरूरमध्ये भरवस्तीत दुकानदारावर गोळीबार..! पिस्तूल हिसकावल्याने वाचला जीव

पुणे : चाकण गोळीबाराची घटना ताजी असताना आता शिरूरमध्ये देखील व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षापूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी कृष्णा वैभव जोशी रा सरदार पेठ, शिरूर ता शिरूर जि पुणे, याच्या विरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी महेंद्र मोतीलाल बोरा, वय 53 वर्ष, धंदा-किरणा दुकान, रा. सरदार पेठ, शिरूर ता शिरूर जि पुणे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 20 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरूर शहरातील सरदार पेठ येथे असणाऱ्या स्वीटी प्रोव्हिजन स्टोअर्स समोर असणाऱ्या हलवाई चौक ते मारुती आळी रोडवर फिर्यादी महेंद्र बोरा यांनी आरोपी विरुद्ध इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षापूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाला. त्या गैरसमजातून आरोपीने दारू पिऊन येऊन फिर्यादी यांच्या दुकानजवळ येऊन त्यांना शिवीगाळ करून आरोपीने स्वतःकडे असलेले पिस्तूल बाहेर काढून ‘मी तुला आज जिवंत सोडणार नाही ‘ अशी धमकी देत पिस्तूलाचा खटका दाबला. परंतु फिर्यादी यांनी त्याचा हात बाजूला घेतला त्याच्या हातून पिस्तूल बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत रोडवर गोळी चालली. त्या स्थितीत त्याने मला जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून आरोपीने पळ काढला.

या प्रकरणी फिर्यादी यांनी शिरूर पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली. या प्रकरणी शिरूर पोलीस अधिक तपास करत आहेत.