खराडी येथील घटनेची राज्य महिला आयोगाने घेतली दखल

मुंबई : पुण्यातल्या खराडी परिसरात पतीने मुलासमोरच पत्नीची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत.

पुण्यातील खराडी परिसरात काल चारित्र्याच्या संशयावरून तसेच संपत्तीच्या वादातून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केली. या घटनेच्या वेळी ६ वर्षाचा लहान मुलगा देखील घरातच होता अशी बातमी माध्यमातून समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सद्यस्थितीत या प्रकरणी खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे. स्वतःच पोलिसांकडे आलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत बोलताना आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर म्हणाल्या, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करतील आणि आरोपीला कठोर शिक्षा होईल. आरोपीने वायरल केलेला व्हिडियो माध्यमांवरून काढून टाकण्यात यावा अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. तसेच या घटनेतील लहान मुलाच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होणार आहेत, त्यादृष्टीने या  लहान मुलाचे समुपदेशन करून त्याची काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाला आयोगाने दिल्या आहेत.