Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

आदर्शवत ! इटलीतील आयर्नमॅन स्पर्धेत पुण्यातील डुंबरे कुटुंबाची “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स”मध्ये नोंद

पुणे: शहरातील डॉ. डुंबरे पाटील कुटुंबाने इटलीत नुकत्याच झालेल्या ‘७०.३ आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये बाजी मारत पुण्याचा आणि भारताचा झेंडा जगाच्या नकाशावर रोवला आहे. हडपसरमध्ये राहणारे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संपत शिवाजीराव डुंबरे पाटील, त्यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट डॉ. वैशाली डुंबरे पाटील, कन्या प्राची व मुलगा प्रसाद यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम झाल्याचे मानपत्र नुकतेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने डॉ. चित्रा जैन यांनी डुंबरे पाटील कुटुंबाला प्रदान केले.

‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ ही स्पर्धा इटलीतील रोमालिया येथे २२ सप्टेंबर २०२४ रोजी झाली. या स्पर्धेत डॉ. संपत, डॉ. वैशाली आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे अंतिम वर्षात शिकणारी प्राची व प्रथम वर्षात शिकणारा प्रसाद यांनी सहभाग घेतला. एड्रियाटिक समुद्रामध्ये १.९ किमी पोहणे, त्यानंतर लगेच ९० किमी सायकल चालविणे आणि २१ किमी धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. ही संपूर्ण स्पर्धा आठ तासात पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते.

विविध देशातील ३५०० पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. पोहण्याच्या वेळी समुद्रातील लाटांचा व सायकलिंगच्या वेळी प्रचंड वारा व चढ उतारांचा सामना स्पर्धकांना करावा लागला. परंतु डुंबरे-पाटील कुटुंबातील चारही सदस्यांनी शारीरिक व मानसिक आव्हानांवर मात करत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेसाठी चौघेही गेल्या ८ ते १० महिन्यांपासून प्रचंड मेहनत घेत होते. प्राची व प्रसाद दोघांनीही आपला अभ्यास सांभाळून स्पर्धेसाठी सरावाला वेळ दिला.

डॉ. संपत डुंबरे पाटील म्हणाले, “ही स्पर्धा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकाच स्पर्धेत अशी कामगिरी करणे हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील एकमेव उदाहरण आहे. अभ्यासाबरोबरच आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी मुलांनी सजग राहावे, हा या मागचा हेतू होता. व्यायाम व शरीर स्वास्थ्यासाठी एकत्र आल्यामुळे आमच्यातील फॅमिली बॉन्डिंग खूप छान झाले आहे.”

“स्पर्धेच्या शेवटच्या काही दिवसात अनेक अडथळे आले. प्राचीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तिला ३ महिने वॉकर वापरावा लागत होता. परिणामी तिचा व्यायाम नीट होत नव्हता. स्पर्धेच्या १५ दिवस आधी तिने मेहनत घेत ताकद मिळवली. प्रसादचीही बारावी व ‘नीट’ परीक्षेची तयारी सुरु होती. अभ्यास सांभाळून त्यानेही प्रशिक्षण पूर्ण केले व आयर्नमॅन स्पर्धेसोबतच बी. जे . वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले, तर मुले निश्चितच त्यात यशस्वी होतात. नियमित व्यायामाचा दोन्ही मुलांना त्यांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप उपयोग झाला. त्यांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती निश्चितच वाढली. या स्पर्धेच्या तयारीसाठी एकत्रित केलेला हा प्रवास आमच्यासाठी अतिशय आनंददायी व अविस्मरणीय आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने त्याची नोंद घेतली, याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे.”
– डॉ. वैशाली डुंबरे पाटील, रेडिओलॉजिस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »