श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान
पुणे : अध्यात्मिक परंपरा, राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणा यांचा मेळ पुण्यात आहे. त्यामुळे पुण्यात येऊन फार आनंद होतो. पुण्यातील प्रकृती आणि लोकं याबद्दल आपुलकी वाटते. इथे काय आणखी सुधारणा करता येतील, हे मी देवेंद्रजींना सांगत असते. ते देखील पुण्याकडे लक्ष देतात, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी केले.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या संस्थापिका लक्ष्मीबाई यांचे स्मृतिप्रित्यर्थ २०२५ सालाचे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार छत्रपती शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या लता मंगेशकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. यावेळी राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्या डॉ. निवेदिता एकबोटे, श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचेअध्यक्ष सुनील रासने, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते.
दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, रुपये २५ हजार रुपये सन्मानराशी, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. निराधार मुली आणि परित्यक्त महिलांसाठी तसेच अनाथ नवजात शिशूंना कायदेशीरपणे दत्तक देण्याचे काम करणा-या ‘महिला सेवा मंडळ’ या संस्थेला तसेच लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी जगद्विख्यात ओबेसिटी तज्ञ डॉ. जयश्री तोडकर आणि विरूपित पाषाण शिल्पांना नवसंजीवनी देणा-या वज्रलेपनकार स्वाती ओतारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘महिला सेवा मंडळ’ च्या ज्येष्ठ विश्वस्त पुष्पा हेगडे यांनी पुरस्कार स्वीकारला. काका हलवाई चे राजेंद्र आणि युवराज गाडवे यांनी दत्तमंदिर ट्रस्टला ५१ हजार रुपयांची देणगी दिली. तसेच यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त अॅड. रोहिणी पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
अमृता फडणवीस म्हणाल्या, दत्तमंदिरात तब्बल १२८ वर्षांपासून प्रत्येकजण श्रद्धा व सेवेसाठी येतो. हे मंदिर समाजाच्या सेवेसाठी अग्रेसर आहे, याचा आनंद आहे. खरी मानवता काय आहे, हे विश्वस्तांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे. गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा व्हावा, यामध्ये लोकमान्य टिळकांच्या पाठीमागे लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ हलवाई यांचा हातभार होता. लक्ष्मीबाई या शांतपणे परिवर्तन घडवून आणत. त्यांच्यामध्ये लोकांप्रती संवेदना होती. त्यांच्यासारखे कार्य या तिन्ही पुरस्कारार्थी यांचे असून आपल्या ज्ञानाचा इतरांना फायदा झाला, तरच जीवन समृद्ध होते, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, लक्ष्मीबाई दत्तमंदिरातील दत्तमहाराजांची जागृत अशी मूर्ती आहे. त्यामुळे मंदिरात आल्यानंतर वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवते. आज ज्या तीन महिलांना पुरस्कार देण्यात आला, त्यांचे कार्य आणि अमृता फडणवीस यांचे कार्य मोठे आहे. त्याप्रमाणे मी देखील वाटचाल करीत आहे.महिला सेवा मंडळाच्या पुष्पा हेगडे म्हणाल्या, संस्थेला ८४ वर्षे झाली असून आम्ही काम करीत राहिलो. कशाचीही अपेक्षा केली नाही. मागील ८४ वर्षांत आम्हाला हा पहिला पुरस्कार मिळाला आहे. आमच्या कामाची ही पावती दत्तमंदिर ट्रस्टने दिली आहे. डॉ.जयश्री तोडकर म्हणाल्या, लक्ष्मीबाई या १२५ वर्षांपूर्वीच्या आंत्रप्रेन्युअर होत्या. त्या धैर्यवान व्यक्ती होत्या. त्यांनी शतकानुशतके आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. आज देशाला शारीरिक तंदुरुस्तीची आवश्यकता असून लठ्ठपणा आणि मधुमेह भारतात ज्याप्रमाणात आहे, तेवढा बाहेर कुठेही नाही. त्यामुळे आपण याबद्दल जागरूक राहून जागृती करायला हवी. स्वाती ओतारी म्हणाल्या, पुरातन मूर्तींच्या व्रजलेपनातून माझी ईश्वरसेवा होत आहे. आज दत्तमंदिर ट्रस्टने स्त्रियांचा केलेला सन्मान अलौकिक आहे. माझ्या हातून ईश्वराची अशीच सेवा घडो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराला पुण्यनगरीचा १२८ वर्षांचा भक्तीमय आणि आध्यात्मिक वारसा आहे. त्या मंदिराच्या लक्ष्मीबाई दगडूशेठ यांच्या कार्याची स्मृती चिरंतन राहावी, यासाठी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. अॅड. प्रताप परदेशी यांनी स्वागत केले. युवराज गाडवे यांनी आभार मानले. डॉ. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.
Leave a Reply