पुणे : पुणे जिल्ह्यातील टोमॅटो साठी प्रसिद्ध असलेले नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होते. गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाला होता. मात्र टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गुरुवारी टोमॅटो मार्केटला टोमॅटोला अवघा अडीच रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात आल्याचे पहायला मिळत आहे.
“टोमॅटोचा हब” म्हणून नारायणगावची ओळख आहे. या बाजारात टोमॅटो एकेकाळी दोनशे रुपये प्रति किलोने विकला गेला आहे. मात्र आता टोमॅटोचे दर थेट अडीच रुपयांपर्यंत घसरले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा लाल चिखल होण्याची वेळ आली आहे. टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दर ढासळले आहेत. त्याचा परिणाम बाजारात अडीच ते दहा रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे.
टोमॅटोचे दर गेल्या काही दिवसांपासून दर हळूहळू पडू लागले आहेत. त्यामुळे शेताकऱ्यांना भांडवल देखील हातात मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळत आहे.