पुणे : कोथरूड परिसरात गजानन मारणे यांच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या एका अभियंत्यांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्शवभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना खडसावले आहे. पोलिसांवर नाराजी व्यक्त करत “अशा पद्धतीने काम सुरू राहिले, तर पुणे पोलिसांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,” अशा शब्दांत त्यांनी पोलिसांवर टीका केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, पुण्यातील गंभीर गुन्हेगारी घटनांवर आणि टोळी प्रमुखांच्या सोशल मीडियावरील प्रभावावर नाराजी व्यक्त करत मोहोळ यांनी पुणे पोलिसांना खडसावले. “आमच्या शहरात अशा प्रकारची गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी पोलीस आयुक्तांना दिला.
मोहोळ म्हणाले, “सोशल मीडियावर गुन्हेगारांचे वाढते प्रस्थ पोलीस का रोखू शकत नाहीत? त्यावर कारवाई का होत नाही? दोन दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये घडलेली घटना निंदनीय आहे. संबंधित व्यक्ती माझ्या कार्यालयातील कर्मचारी नसला, तरी तो भाजपचा कार्यकर्ता आहे. कोथरूडमध्ये त्याला राहण्यासाठी जागा नव्हती म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. कोणत्याही नागरिकासोबत असे घडू नये. काही जणांवर कारवाई झाली असली, तरी ती अपुरी आहे. पुण्यात कुठेही असे प्रकार घडले, तर ते सहन केले जाणार नसल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
Leave a Reply