पुणे : विवाह म्हणजे दोन हृदयं आणि दोन कुटुंबांना जोडणारा सोहळा, पण काही लग्नं त्याहून अधिक खास असतात. पुण्यात नुकताच पार पडलेल्या एका आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्यात ऑस्ट्रेलियन जोडपं, हॅना आणि कॅरन यांनी हिंदू पद्धतीने विवाह बंधनात अडकून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
हॅना आणि कॅरन यांना भारतीय संस्कृतीचा आदर असल्याने पारंपरिक हिंदू पद्धतीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या इच्छेला पुण्यातील वसुधा व वामन जोशी यांच्या कुटुंबाने संपूर्ण पाठिंबा दिला आणि या शुभकार्याचा संपूर्ण भार उचलला.यातील मुलगा हा फ्रेंच असून मुलगी हि ऑस्ट्रेलियन आहे. पुण्यातील आपल्या मैत्रिणीकडे ते आले होते.
हळदी, मेहंदी आणि फेऱ्यांचा अनुभव
लग्नाच्या आधीपासूनच हॅना आणि कॅरन यांनी भारतीय परंपरेतील प्रत्येक विधींमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. हळदीच्या सोहळ्यापासून ते फेऱ्यांपर्यंत प्रत्येक क्षण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कौतुक घेऊन आला. दोघांनीही पारंपरिक भारतीय वेष परिधान केला. कॅरनने शेरवानी आणि मुंडावळ्या, तर हॅनाने मराठमोळी नऊवारी साडी घातली होती.
संस्कारांचा आदर
“भारतीय विवाह पद्धतींमध्ये असलेला भावनिक आणि आध्यात्मिक स्पर्श आम्हाला खूप प्रेरणादायी वाटला,” असे हॅना सांगते. “फेऱ्यांदरम्यान दिलेल्या प्रत्येक वचनाने आमच्या नात्याला अधिक मजबूत केले,” असे कॅरन म्हणाला.
दोन संस्कृतींचे मीलन
हा विवाह सोहळा म्हणजे दोन संस्कृतींचं सुंदर मीलन होतं. जोशी कुटुंबाने वधूवरांना भारतीय परंपरेची ओळख करून दिली, तर हॅना आणि कॅरन यांनीही भारतीय परंपरा आनंदाने स्वीकारल्या. “प्रेमाला ना देशाची सीमा असते, ना संस्कृतीचं बंधन,” या विचाराने हे लग्न अधिक प्रेरणादायी ठरलं.
प्रेरणादायी संदेश
हा विवाह फक्त एक सोहळा नव्हता, तर प्रेम, आदर, आणि विविधतेचा सन्मान यांचं प्रतीक होतं. हॅना आणि कॅरन यांचा हा आगळावेगळा विवाह जगाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.