भुजबळ समर्थकांचे बारामतीत अजितदादांच्या घराबाहेर ठिय्या

बारामती: नव्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना डावलले गेल्याने भुजबळ समर्थक चांगलेच संतापले आहेत. गेल्या दोन दिवसापासून छगन भुजबळ यांचे समर्थक हे ओबीसींचा फक्त महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी उपयोग केला का? असा प्रश्न विचारत आहेत.छगन भुजबळ यांनी ‘जहा नही चैना वहा नही रहना’ असे वक्तव्य केल्यानंतर माळी समाजात त्याचे संतप्त पडसाद उमटले.

एकीकडे भाजपने माणचे आमदार जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांना मानाचे स्थान दिले. मात्र ज्या नेत्यांच्या बळावर राष्ट्रवादी निवडून आली ते नेते मात्र डावलले जात आहेत.अशी भावना भुजबळांच्या समर्थकांमध्ये असल्याचे पहायला मिळाले. याचा निषेध म्हणून भुजबळ समर्थकांनी अजितदादा पवार यांच्या बारामती येथील निवास्थानाबाहेर मंगळवारी निषेध आंदोलन करत अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

बारामतीतील काही नेते निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी बारामतीतील भिगवण रस्त्यावरील अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीच्या रस्त्यावरच ठाण मांडले आणि तिथूनच त्यांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून डावल्याचा निषेध व्यक्त केला.यावेळी बारामतीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. सहयोग निवासस्थाना समोरील देखील पोलीस बंदोबसात वाढ केली आहे. कार्यकर्त्यांनी ओबीसीचा बुलंद आवाज म्हणत छगन भुजबळांच्या नावाने घोषणा दिल्या.