बारामती : बारामातीतील तुळजाराम छत्रपती रस्त्यावर एक 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यातील हा तिसरा खून असल्याने बारामतीतील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे.
अनिकेत गजाकस असे खून झालेल्या युवकाचे नाव असून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून नंदकिशोर पंजाबराव अंभोरे , महेश नंदकुमार खंडाळे , संग्राम खंडाळे अशी या आरोपींची नावे आहेत. मुलीशी बोलत असल्याच्या संशयावरुन हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बारामती शहरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास अनिकेत सदाशिव गजाकस हा रस्त्यावरून जातं असताना तिघांनी अचानक येऊन त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात अनिकेत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिषेक सदाशिव गजाकस यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पोलिसांनी तिघेजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन चेके करत आहेत.