दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : ‘दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक असून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल. त्यासाठी विविध घटकांच्या सहकार्याने प्रभावी उपायोजना करण्यात येतील.’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणून त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ ते १९ जानेवारी, २०२५ या कालावधीत मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर ‘पर्पल जल्‍लोष’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ. उमा खापरे, आ. अण्णा बनसोडे, आ. अमित गोरखे, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते.‌

उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, राज्याच्या लोकसंख्येच्या साधारणपणे पाच टक्के लोकसंख्या दिव्यांग बांधवांची आहे. दिव्यांग बांधवांसाठीच्या योजना राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ठराविक निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याबाबतचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात येईल. यासंबंधीचे आदेश देखील आदेश लवकर काढले जातील. राज्याचा अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी तरतूद केली जाईल. दिव्यांग व्यक्तींची संख्या किती आहे, यासाठी जिल्हानुसार दिव्यांगांचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती श्री. पवार यांनी दिली. महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांना मिळकत करात सवलत द्यावी आणि अतिक्रमणविरोधी कारवाई करताना दिव्यांगाना मानवतेच्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्याची सूचना श्री.पवार यांनी केली.

दिव्यांग भवनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेने दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम सुरू केले आहे. दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, रोजगार कार्यक्रम घेणे, आरोग्य उपाययोजना करणे यावर भर देण्यात येईल आणि दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांतील पदे लवकरच भरण्यात येतील. दिव्यांगांना योग्य मार्गदर्शन केले तर ते कर्तृत्वाचे शिखर गाठू शकतात, हे पर्पल जल्लोष सारख्या कार्यक्रमातून दिसून येते. दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचे, त्यांना प्रेरणा देण्याचे काम समाज म्हणून आपल्या सर्वांचे आहे असे श्री. पवार म्हणाले.

पर्पल जल्लोष कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा मला आनंद झाला आहे असून पर्पल जल्लोष कार्यक्रम समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांनी पाहावा असा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

*ससून रुग्णालयात दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळणार*

पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दिव्यागांना प्रमाणपत्र दिले जात आहे त्याच धर्तीवर ससून रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात देखील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येतील, यासाठी आवश्यक ते निर्देश देण्यात येतील अशी घोषणा श्री. पवार यांनी यावेळी केली.

*प्रदर्शनातील स्टॉलला उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट*

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनातील दिव्यांगांच्या उपयोगाच्या स्वयंसेवी संस्थांच्या स्टॉलला भेट दिली. प्रदर्शनात ४० पेक्षा जास्त स्टार्टअप्स,कार्पोरेट कंपन्यानी दिव्यांगांसाठीच्या निर्मिती केलेल्या नवनवीन वस्तू पाहण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनास सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्पल जल्लोष कार्यक्रमास दिल्या शुभेच्छा*

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी पर्पल जल्लोष – दिव्यांगांचा महाउत्सव या अभिनव उपक्रमाद्वारे दिव्यांगांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी आवश्यक असणारी माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना, कायदे, अधिनियम आणि हक्क याबाबत माहिती मिळेल. यामुळे दिव्यांगांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल.

महाउत्सवात साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामुळे दिव्यांगाना आपल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यासाठी महाउत्सव एक आदर्श ठरेल, असा मला विश्वास आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

सचिव राजेश अग्रवाल यांनी केंद्र सरकारकडून दिव्यांगांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

परांजपे स्किमचे व्यवस्थापकीय संचालक शंशाक परांजपे, युनिसेफचे संजय सिंह, अभिनेते दर्शिल सफारी यांचा दिव्यांगांसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी करताना दिव्यांगांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची तसेच दिव्यांग भवनाची माहिती दिली. दिव्यांगांचे प्रतिनिधी म्हणून मानव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले.

कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, दिव्यांग बांधव, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.