पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या हातात शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह मोरेश्वर भोंडवे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. चिंचवड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे मोरेश्वर भोंडवे यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अजित पवार गटाला खिंडार पडले आहे.
चिंचवड विधानसभा हा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोरेश्वर भोंडवे यांनी अजित पवार गटाला जय महाराष्ट्र केल्याने मोरेश्वर भोंडवे यांच्या भूमिकेकडे पिंपरी चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.
मोरेश्वर भोंडवे हे अजित पवार गटात असताना त्यांनी आणि त्यांच्या काही सहकारी नगरसेवकांनी चिंचवड विधानसभा निवडणूक ही महायुतीत अजित पवार गटानेच लढावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे मोरेश्वर भोंडवे यांची शिवसेना ठाकरे गटात नेमकी भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. त्यातच कट्टर समर्थक असलेल्या भोंडवे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने चिंचवड विधानसभेची अनेक राजकीय गणिते बदलणार आहेत. येणाऱ्या काही दिवसात चित्र स्पष्ट होणार असून ही जागा कुणाला सुटते हे पाहने तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
चिंचवड विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला मानाला जातो. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराविरोधात महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार उतरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.