शेतीतील भन्नाट प्रयोग…!बारामतीत नेदरलँडचे तंत्रज्ञान वापरून एकाच खोडाला घेतले वांगी आणि टोमॅटोचे पीक

पुणे : बारामती म्हटलं की समोर येतो विकास. सर्वच क्षेत्रामध्ये बारामतीत विकास झालेला पाहायला मिळतो. त्याच प्रमाने शेतीत देखील बारामती यशाच्या शिखरावर पोहचली आहे. बरामतीत आता चक्क नेदरलँडचे तंत्रज्ञान वापरून शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे. यात एकाच खोडाला टोमॅटो आणि वांगी यांचे एकत्रित उत्पादन घेण्यात आले आहे. याला द्विपिक पद्धती म्हणतात. नेदरलँडच्या या तंत्रज्ञानाचा ब्रोमाॅटो प्रयोग असे म्हणतात.

भारतीय बाजारपेठेतील लहरी शेतमालाच्या बाजारभावाचा प्रभाव लक्षात घेत एका पिकाने नुकसान केले तरी दुसऱ्या ठिकाणी हात द्यावा अशा अर्थानं ही दोन पीक एकाच खोड्यावरती घेण्यात आली आहेत. जेणे करून एकाच पाण्यामध्ये दोन पिके पिकवून त्यांचे अखंड उत्पादन घेण्याचा प्रयोग आहे. याचे अनेक फायदे देखील असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.

या संदर्भात बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ यशवंत जगदाळे यांनी सांगितले की, हे बहुपीक तंत्रज्ञान नेदरलँड मध्ये सर्रास वापरले जाते. महाराष्ट्राच्या बाजारपेठेचा विचार केला तर एकाच वेळी वांगी आणि टोमॅटो यांचे दर वाढत नाहीत. मात्र ही दोन्ही पिके एका कुळातील आहेत. त्यामुळे एकाच खोडावरती ही दोन पिके घेतली तर एका क्षेत्रामध्ये दोन पिकांचे उत्पादन घेता येऊ शकेल. त्याचबरोबर ते अधिक रोगप्रतिकारक्षम असून जास्त काळ चालणारे आहे. त्यामुळे उत्पादन देखील अधिक मिळू शकते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन पिकांचा उत्पादनाचा फायदा होऊ शकतो असे जगदाळे यांनी सांगितले आहे.