विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे : राज्यपाल

पुणे : ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असून कोणतेही काम करताना फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणत त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवनाच्या वतीने 17 ते 19 जानेवारी या कालावधीत ‘पर्पल जल्‍लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा समारोप राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अमित गोरखे, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, राज्याच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सल्लागार विजय कान्हेकर, अभिजित मुरुगकर, दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, संगीता काळभोर, राजेंद्र वागचौरे उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाऊंडेशन यांनी दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी जे पाऊल उचलले आहे ते कौतुकास्पद आहे. आजचा हा सोहळा म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या प्रबळ इच्छाशक्तीचा केलेला सन्मान आहे. असा अनोखा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महापालिकेचे अभिनंदन करतो. पर्पल जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यामागे असणारा उद्देश खूप मोठा आहे. याठिकाणी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्था यांच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी एखाद्या उद्योगाला मानवी भावनांची जोड मिळाली तर प्रगती करणे सहज शक्य होते याचा प्रत्यय आला, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.