संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी पालकांनी मुलांना वेळ देण्याची गरज : निवृत्ती महाराज इंदूरीकर यांचे प्रतिपादन

पुणे : समाजात आज विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. शहर असो की ग्रामीण भाग पालकांना मुलांना देण्यासाठी पैसा आहे मात्र वेळ नाही. परिणामी मुलं, मुली नक्की काय करतात, त्यांचे मित्र – मैत्रिणी कसे आहेत याचा आई – वडिलांना पत्ता नसतो. आपलयांवर कोणाचे लक्ष नाही, कुणी आपल्याला काही बोलत नाही यातून युवा पिढीच्या मनामध्ये वाईट प्रवृत्ती वाढीस लागत आहेत.  आपल्याला सुसंस्कारी समाज निर्माण करायचा आहे, यामुळे पालकांनी आपल्या मुलांना वेळ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी केले. 

श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ व ॲम्युनिशन फॅक्टरी तसेच संलग्न संस्थेच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकी येथे हा महोत्सव सुरु आहे. ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदूरीकर बोलत होते. यावेळी कीर्तन महोत्सवाचे अध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वांजळे, सामजिक कार्यकर्ते भोला वांजळे, रमेश वेडे पाटील (माजी अध्यक्ष), गजानन महाराज जंगले, शरद गडेकर, गणेश काटे, निलेश वाघमारे, संतोष मेदनकर, संजय दांडगे, विजय बोत्रे (माजी अध्यक्ष),बाळासाहेब कदम, दौलत आबा भुजबळ,
संजय पाटील, राहुल येमुल आमोल येमुल, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या आवाजातली दिव्य भक्ति आणि ते ज्या सहजतेने जीवनाच्या गोडीच्या आणि साध्यतेच्या मार्गावर भाष्य करतात, त्यामुळे उपस्थित श्रोत्यांना एक अद्वितीय अनुभव मिळाला. त्यांचं कीर्तन भगवान श्रीराम, श्री कृष्ण आणि विठोबा यांची महिमा गात, भक्तिरसात सर्व श्रोत्यांना तल्लीन करत होते. भक्तिरस आणि भावुकतेने भरलेल्या या कीर्तनात निवृत्ती महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या गजरात ‘रामकृष्णहरी’ चा गजर करत, जीवनातील साधेपणा, प्रेम आणि श्रद्धेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले.

तसेच, समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांनी आपल्या किर्तनाच्या माध्यमातुन सामाजिक प्रश्नांवर भाष्य करताना इंदूरीकर महाराज यांनी  मुलांनी आई – वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीर असे दोन्हीचेही नुकसान होते असेही त्यांनी सांगितले.