सोनसाखळी चोरांवर जरब बसवा, भाजपा कोथरूड मंडलाची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी

पुणे : कोथरूड आणि कर्वेनगरमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. कोथरूडमध्ये, मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरले, तर कर्वेनगरमध्ये एका सोसायटीत घुसून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. या घटनांमुळे पुण्यातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सोनसाखळी चोरांवर जरब बसविण्याची मागणी भाजप कोथरुड मंडलाच्या वतीने आज करण्यात आली.

भाजपा कोथरूड मंडलाच्या शिष्टमंडळाने आज कोथरूड मधील अलंकार पोलीस चौकीच्या निरिक्षक सुमिता रोकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी कोथरूड मधील सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असून, महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. कर्वेनगर भागात बुधवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. त्याचे सीसीटीव्ही समोर आले असून, दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने वृद्ध महिलेवर पाळत ठेऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. यावेळी हिसकवताना मंगळसूत्राचा एक भाग तुटला आणि खाली पडला, मात्र चोरटा परत आला आणि पडलेला भाग उचलून घेऊन गेला. या घटनेमुळे कर्वेनगर परिसरात सुरक्षा आणि पोलिसांच्या कार्यवाहीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दुसऱ्या एका घटनेत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका महिलेची सोनसाखळी हिसकावली. ही घटना देखील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. चोरट्यांनी थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये घुसून महिलेची सोनसाखळी लंपास केली. त्यामुळे या दोन्ही घटनांचे गांभीर्य पाहता, पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, आणि चोरावर जरब बसवावी. त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस गस्त वाढवावी, अशी मागणी केली.

यावेळी कोथरूड मंडळाचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, पुणे शहरांचे सरचिटणीस पुनीतजी जोशी,नगरसेवक दीपकजी पोटे, नगरसेवक जयंतजी भावे,नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, स्वीकृत सदस्‍य ॲड.मितालीताई सावळेकर, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल सरचिटणीस दीपकजी पवार, गिरीशजी खत्री, प्रभाग १३ च्या अध्यक्ष ॲड. प्रचिताई बगाटे, युवा मोर्चा सरचिटणीस कुणाल तोंडे, असिफ तांबोळी, महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ.गौरीताई करंजकर, जेष्ठ नागरिक आघाडीचे सरचिटणीस नितीन कंधारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.