बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू, 10 प्रवाशी, तीन कर्मचाऱ्यांचा समावेश

मुंबई : गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या बोटीला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निलकमल ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियावरुन 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जात होती. या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, नौदलाच्या या स्पीड बोटीला नवीन इंजिन लावले होते. त्यामुळे समुद्रात त्याची त्याची चाचणी सुरू होती. मात्र त्याचवेळी या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरील नियंत्रण सुटले आणि ही बोट प्रवासी बोटीला जाऊन धडकली. अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

या दुर्देवी घटनेत 10 प्रवाशांचा आणि तीन नौदलाच्या बोटीवरील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे या अपघातातील 101 जणांचा वाचवण्यात यश आलं असल्याचे सांगण्यात आले आहे.